पोखरणचे मंदिर कल्याण पश्चिमेतील पारनाका येथे स्थित आहे. मंदिराच्या परिसरात तीन देवता आहेत – श्री गणेश, शंकर आणि श्रीराम. सतराव्या शतकात बांधलेले हे स्मारक महाराष्ट्राच्या प्राचीन नागरी आणि स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिराच्या आशीर्वादाने शहराचे रक्षण झाले असून, कोणतीही मोठी आपत्ती येण्यापासून रोखली आहे, अशी कल्याणमधील रहिवाशांची धारणा आहे. दंतकथेशिवाय, वस्तुस्थिती अशी आहे की शहरातील लोक कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी येथील देवतेची पूजा करतात. कल्याणमधील जुने रहिवाशी असेही सांगतात कि सहसा कुटुंबातील पहिले लग्नाचे आमंत्रण पत्र मंदिरातील देवतेसमोर ठेवले जाते.
मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या भागातील जलसंकट दूर करण्यासाठी सुभेदार राणाजी बिवलकर यांनी बांधलेला विशाल तलाव. कल्याणमधील सुप्रसिद्ध इतिहासकार काका हरदास यांच्या म्हणण्यानुसार, 1765 च्या दुष्काळात या भागातील सर्व विहिरी कोरड्या पडल्यामुळे आणि लोकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळू न शकल्याने सुमारे चार चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला मोठा तलाव बांधला बांधण्यात आला होता. धातूचे पाइप नसल्यामुळे, सुभेदार यांनी मातीच्या नळ्यांचे तंत्रज्ञान वापरले, ज्याला ‘खापरी नाल्या’ (मातीच्या नळ्या) म्हणतात आणि पोखरण मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या काळा तलावातून पाणी आणले. काम पूर्ण झाल्यावर, केवळ तलावच नाही तर परिसरातील इतर विहिरींनाही पाणी मिळू शकले.