सौ. मालतीबाई गोसावी या १९५६ साली कल्याणला आल्या. मालतीबाईंचे पती पं. वसंतराव गोसावी हे स्वतःगायक आणि संगीत शिक्षक. कल्याण गायन समाजाच्या दिनकर संगीत विद्यालयात विद्यालय प्रमुख म्हणून गोसावी मास्तरांची नेमणूक झाली. आणि गोसावी कुटुंब गायन समाजात रहायला आले.
कोटुंबिक परिस्थिती हलाखीची होती. पण गायन समाजानं दिलेल्या आगगाडीच्या डब्यासारख्या लांबलचक असलेल्या खोलीत मालतीबाईंनी आपला संसार थाटला. खोलीच्या शेवटी एक मोरी होती. तिथं एक पडदा लावला. मग स्वयंपाकाचं छोटसं टेबल, तेच स्वयंपाक घर, त्याला पडदा लावला. त्या पडद्याबाहेर एक खुर्ची व पलंग ही बैठकीची खोली. अशा मोठ्या कौशल्याने बाईंनी आपला संसार मांडला. तुटपुंजी मिळकत संसाराचा गाडा ओढायला पुरेशी नव्हती म्हणून बालक मंदिर या शाळेत हार्मोनियम शिक्षिका म्हणून केवळ १०/- रुपयांवर नोकरी धरली.
मालतीबाईंचे वडिल ब्रिटिश आमदानीत पोष्टमास्तर होते. माहेरी संगीताचे अजिबात वावडे होते. मालतीबाईंना संगीतात काही म्हणता काही कळत नव्हते. परंतु कल्याणला आल्यावर पती वसंतराव गोसावी यांचेकडे मालतीबाईंनी हार्मोनियमचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्या सतत प्रगती पथावरच राहिल्या. “संगीत उपांत्य” परिक्षा पास झाल्या. ‘संगीत शिक्षक सनद’ ही पदवी त्यांनी मिळविली. याशिवाय सहकारी सचिव’ चा कोर्स पूर्ण करून पदवी मिळविली. विद्यालयात आपल्या पतीवर पडणारा कामाचा ताण पाहता मालतीबाईनी बालक मंदिरातील नोकरी सोडली. विद्यालयात त्यांनी हार्मोनियम व गायन शिक्षिका म्हणून काम सुरु केले. हे काम अखंडपणे त्यांनी २२ वर्षे केले.
असं म्हणतात की प्रत्येक कर्तबगार पुरुषामागे उभी असते ती त्याची पत्नी पण पत्नीमागे काय असते? पतीची शाबासकी व प्रोत्साहन. पण संगीतवेड्या पतीला या गोष्टीचे भान नव्हते. अनेक खडतर प्रसंगांना बाईंनी एकटीने खंबीरपणे तोंड दिले. अशा प्रसंगी बाई डगमगल्या नाहीत की कोलमडल्या नाहीत.
संगीतवेडा पती आपल्या सहाध्यायी मित्रांबरोबर कधी कधी गप्पागोष्टी करीत बसायचा. कंधी संगीताची बैठक असायची. मग सहजगत्या वसंतराव मित्रमंडळींना घरी घेऊन येत. जेवायला बसलेल्या मुलांना “घासातला घास वगळा रे” असे नुसत्या नजरेनेच बाई सांगत. त्यांनी आलेल्या पाहुण्यांना कधी विन्मुख पाठविले नाही. पाहुणा स्वयंपाकाची तारीफ करीतच घरी जाई.
सौ. मालतीबाईंनी स्वतः संगीत साधना तर केलीच पण मुलांना संगीत शिक्षणाबरोबर उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं. मालतीबाईची मुलगी संगीत अलंकार आहेच पण संगीत घेऊन तिने एम. ए. केले. लहानपणी कधी रागावून तर कधी धाक दाखवून मुलीला शिकवलं. बाईंची ही मुलगी सौ. प्राची देवस्थळी टी.व्ही. स्टार व उत्कृष्ट समालोचक म्हणून प्रसिध्द आहे. मुलं उच्च पदस्थ आहेत. धाकटा मुलगा दिलरुबा हा हार्मोनियम शिकवितो.
सौ. मालतीबाईंना अभिनयाची चांगली जाण होती. मालतीबाईंनी केवळ संगीत आणि संसार एवढंच केलं नाही तर मुलं मोठी झाल्यावर त्या महिला मंडळात सक्रिय काम करू लागल्या. १९७० ते १९७४ पर्यंत, महिला मंडळाची सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलं.
लोणावळा येथील “न्यू रेस्ट वे” या संस्थेच्या त्या साधक होत्या. कल्याण व आसपासच्या खेडोपाडी जाऊन तिथल्या लहान मुलांवर सुसंस्कार करण्याचं काम त्या करत असत. खेड्यातील मुलं सुजाण, सुदृढ व्हावीत म्हणून त्या प्रयल करत. ही मुलं उद्याच्या भारताची आदर्श नागरिक व्हावीत म्हणून अनेक ठिकाणी शिबिरे भरवून मुलांना शिकविण्याचे काम त्या करत. मालतीबाईंना समाजकार्याची तळमळ व संगीताची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. समाज कार्याबरोबर गायन व पेटी वादनाच्या खाजगी शिकवण्या त्या करत.
मालतीबाई म्हणतात, “माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं । माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं॥
मालतीबाई गोसावीं ह्यांचे दिनांक ०२/०१/२०११ रोजी वृद्धापकाळामुळे दुःखद: निधन झाले.
1 Comment
खूपखूप छान आणि सुंदर असे हे तुझ्या आज्जी चे आणि माझ्या व्यक्तिमत्व आहे. लोभस, साक्षेपी आणि अत्यंत संवेदनशील आहे.