कल्याणमधील माऊंटन बायकर सुशांत करंदीकर ह्यांची ग्लोबल कल्याणने घेतलेली मुलाखत
सुशांत करंदीकर ह्यांना वयाच्या बाराव्या वर्षापासूनच सायकल चालवायचा छंद लागला. पुढे पुढे या छंदाचे रूपांतर वेडात झाले. आता सायकलिंग करणे हे एक त्यांचे पॅशन बनले. अशातच गिर्यारोहणाची ही आवड निर्माण झाली.
मी माझ्या काही ट्रेकर्स मित्रांबरोबर ट्रेकर्सची पंढरी असलेल्या हरिश्चंद्रगडावर गेलो. तिथला नयनरम्य सनसेट बघताना माझ्या मनात एक वेगळीच कल्पना आली, जर हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर सायकल चालवली तर? खरंतर हा एक वेडा विचार होता. थिंक आऊट ऑफ द बॉक्स म्हणतात ना तसा. अवघड किल्ले अतिशय अवघड वाटेने सर करणारे बरेच ट्रेकर्स आहेत पण सायकलने ट्रेक ही आयडिया भन्नाट होती. अपेक्षेप्रमाणे सगळ्या मित्रांनी वेड्यात काढले.
आपण जेव्हा सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करतो तेव्हा हा सह्याद्रीच आपल्याला कळत नकळत आव्हाने द्यायला आणि पेलवायला शिकवत असतो. त्यासाठी लागते ते सह्याद्रीचे वेड. असाध्य गोष्ट जर विचारपूर्वक, आखणीने, जिद्दीने केली तर तीही शक्य होते. अशी अचाट काम करणं हे गिर्यारोहकांच्या रक्तातच असतं.
माझ्या या असामान्य कल्पनेला मूर्त स्वरूप आले ते १७, १८ नोव्हेंबर १९९४ साली. मी व माझा मित्र संजय जांभुळकर आणि आम्हा दोघांच्या सायकली. कल्याण पासून सुरुवात केली ती थेट हरिश्चंद्रगडावर. तोलारखिंडी मार्गे आम्ही चढायला सुरुवात केली. सह्याद्रीतील पर्वतरांगा शारीरिक क्षमतेची परीक्षा घेणाऱ्या असतात. प्रचंड ऊन, भन्नाट वारा, खडकाळ प्रदेश अशी एकापेक्षा एक खडतर आव्हान दोन पायांवर ट्रेक करणाऱ्यांनाही पेलावी लागतात. इथे तर सायकलवरून किल्ल्याचा माथा गाठणे ही तर परीक्षाच होती. या अचाट सफरीत वाटेमध्ये भेटणारे सर्वच ट्रेकर्स आश्चर्याने आमच्याकडे बघत होते. शक्य होईल तिथून सायकलने व शक्य नाही त्यावेळी सायकल खांद्यावर टाकून आम्ही पुढे पुढे जात राहिलो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज असते ती म्हणजे इच्छाशक्ती. आणि याच बळावर आम्ही अतिशय अवघड वाट सर केली. हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर पोहोचलो. वरती असलेल्या गुफांमध्येच आम्ही आमच वास्तव्य निश्चित केलं आणि सायकलने थेट कोकणकडा गाठला. पहिल्यांदाच काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा आनंद होता. गडावरची सर्व ट्रेकर्स मंडळी सुद्धा आश्चर्याने आम्हा दोघा सायकल वीरांना बघत होती आणि कौतुकाची थापही देत होती. हे क्षण केवळ अवर्णनीय असेच होते.
यानंतर अशा प्रकारच्या मोहिमांची सुरुवात झाली ती २००१ च्या डिसेंबर अखेरला. वर्षाचा शेवटचा आणि येणाऱ्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आम्ही आमच्या माउंटन बँकिंगच्या वेडाला दिला. नववर्षाचे स्वागत डोंगर माथ्यावर नववर्षाचा उगवता सूर्य पाहून करू लागलो. माऊंटन बायकींग करून आपली शारीरिक क्षमता सातत्याने विकसित करावी हेच उद्दिष्ट ठेवले. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे तसेच त्यावर चालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सायकल सारख्या पर्यावरण स्नेही वाहनाचा लोकांनी अधिक अधिक वापर करावा. ही काळाची गरज ओळखून आम्ही 2001 साली माउंटन बायकिंग ची मुहूर्तमेढ रोवली.
गेल्या वीस वर्षात वीस मोहिमांमध्ये शंभर किल्ले सर केले. शंभरावा किल्ला शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी रायगडावर केला.
२० वर्षातील मोहिमांमध्ये प्रामुख्याने महिलांचाही सहभाग होता.
काही वैशिष्ट्यपूर्ण व अतिशय अवघड मोहिमा म्हणजे
– सर्वोच्च शिखर कळसुबाई – रतनगड
– सर्वोच्च किल्ला साल्हेर – सालोटा – हरगड – मुल्हेर
– राजमाची – ढाक बहिरी – भीमाशंकर (शिडी घाट मार्गे)
– अलंग – मदन – कुलंग
– तोरणा – राजगड, पन्हाळगड ते विशालगड
– दहाव्या वर्षी दहा किल्ले सर केले. अवचित गड – सुधागड – तैल बैला – घनगड – तुंग – तिकोना – विसापूर – लोहगड
या व्यतिरिक्त केलेल्या उल्लेखनीय कामगिरी म्हणजे
-1997 दक्षिण भारत सायकल मोहीम
– 1998 संपूर्ण भारत सायकल मोहीम
– 2003 पूर्व महाराष्ट्र सायकल मोहीम
– 2011 श्रीनगर – लेह – मनाली सायकल मोहीम
– मुंबई – पुणे सायकल शर्यती मधे कामशेत प्राईम
तसेच कल्याण मधील तृप्ती सायकल मार्ट चे दुर्वेश झिपरे यांनी तयार केलेली डबल व ट्रिपल सायकल घेऊन कल्याण – पाली – कल्याण असा प्रवास विलास वैद्य व इतर अनेक साथीदारांच्या सोबत केला.
“दर महिन्यात आम्ही एक ट्रेक अरेंज करतो. किल्ल्याची माहिती हे त्या किल्ल्यावरच जाऊन घेणे यात एक वेगळाच आनंद असतो. ट्रेक केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढण्यास मदत होते” असे सुशांत करंदीकर ह्यांनी ग्लोबल कल्याणला सांगितले.
सुशांत करंदीकर
7738010990