शासनाच्या व्यसन मुक्ती पंधरवड्याअंतर्गत ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षातर्फे अंमली पदार्थ आणि त्यांची अवैध तस्करीविषयी डोंबिवलीतील नामांकित विद्यालयांमध्ये नुकतेच जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये व्यसनमुक्तीसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या गोवेली येथील दिशा सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कुटूंबातील एका व्यक्तीच्या व्यसनापायी अख्खे कुटुंबच उद्ध्वस्त होते. हे कुठे तरी थांबण्याच्या तसेच व्यसनाधीनतेची कारणे शोधून त्यांना दूर करण्याच्या उद्देशाने सरकारतर्फे व्यसन मुक्ती पंधरवड्याचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करून माहिती दिली जाते. २६ जून हा दिवस जगभरात अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो.
हे ही वाचा >> दिशा सामाजिक सेवा संस्था – एक पाऊल व्यसनमुक्तीकडे
शालेय आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ कसे घातक असतात आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो ? ह्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी डोंबिवलीच्या प्रगती आणि मॉडेल कॉलेजमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि पोलीस उपनिरीक्षक दीपेश किणी यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ काय असतात ? त्यांचा शरीरावर कसा घातक परिणाम होतो? पर्यायाने मानसिक आरोग्य कसे धोक्यात येते ? इतकेच नाही तर सामाजिक आयुष्यावरही कसा परिणाम होतो? याविषयी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी अंमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त झालेल्या आणि आता चांगले आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखतीचे व्हिडिओ दाखवण्यात आले.
तर दिशा सामाजिक सेवा संस्थेच्या कार्यकारी सदस्यांनीही आताची पिढी कशी भरकटत चालली असून त्याला वेळीच कसा आळा घालता येईल याविषयी व्यसनमुक्तीचे जिवंत अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या घातक परिणामांविषयी सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या आवारात कोणी अंमली पदार्थ सेवन करताना अथवा विकताना आढळ्यास स्थानिक पोलिसांना किंवा आपल्या शिक्षकांना यासंबंधी लगेचच माहिती देण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थाना केले.
या कार्यक्रमाला अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस आयुक्त इंद्रजित कार्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक दीपेश किणी, पोलीस हवालदार राजकुमार तरडे, शिवाजी वासरवाड, हरीश तावडे, महेश साबळे, महिला पोलीस हवालदार वैष्णवी परांजपे, पोलीस नाईक अनुप राक्षे यांच्यासह दिशा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुऱ्हाडे, संचालक गणेश रोकडे आणि संस्थेचे कार्यकारी सदस्यही उपस्थित होते.