आज समाजातील तरुण वयोगटातील मुले – मुली व्यसनांच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत. व्यसनांचे होणारे दुष्परिणाम आणि तोटे ह्याबद्दल ते जागरूक नसतात. व्यसनापायी आख्खे कुटुंब उध्वस्त होते. व्यसनामुळे माणूस कुटुंब, नातेवाईक आणि समाजापासून दूर होतो. व्यसन म्हणजे नेमके काय? व्यसनांमुळे काय होऊ शकते? व्यसनाधीन व्यक्तीचे पुनर्वसन होऊन पुन्हा तो एक जबाबदार व्यक्ती होऊ शकतो का? असे अनेक प्रश्न आहेत.
आज आपण भेटत आहोत श्री. अविनाश वैद्य ह्यांना…जे व्यसनातून जाऊन आज एक जबाबदार नागरिक बनले आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या व्यसनमुक्तीच्या प्रवासाबद्दल….त्यांच्याच शब्दात.
मी अविनाश वैद्य, तुमच्या सारखाच सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलो. घरातील परिस्थिती तशी बिकट होती. पण आनंदी, समाधानी आणि सुकृत. त्यामुळे आई वडिलांनी दिलेली चांगली वागणूक व संस्कार ह्यामुळे माझ्यात सकारात्मक सुधारणा होत गेली. त्याही परिस्थितीत आई वडिलांनी चांगले शिक्षण दिले. परिस्थितीशी चांगला सामना करत दहावी पर्यंत शिक्षण झाल. पुढे भरपूर शिकायचे होते. पण पाठीमागे असणारे दोन भाऊ व एक बहिण ह्यांचे पण शिक्षण बाकी होते. म्हणून मला इच्छा नसताना सुद्धा नोकरी करावी लागली. त्यामुळे घरामध्ये मदत होण्यास हातभार लागला. मी विचार केला कि मी पुढचे शिक्षण नाही घेवू शकलो पण माझी भावंड तर शिक्षण घेतील या अपेक्षेने मी नोकरीचा स्वीकार करून मेहनत करण्यास सुरवात केली.
माझ्या जीवनात आलेला एक असा मोड किंवा वळण ज्यामुळे सर्व संस्कारांवर पाणी फिरल गेल. मी अश्या मित्रांच्या संगतीला लागलो कि माझे संपूर्ण आयुष्य संपल्यात जमा झाले. माझी निवड चुकली आणि मी व्यसनाच्या आधीन झालो. वेळोवेळी आई वडिलांनी माझी होणारी चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या डोळ्यांवर व्यसनाची धुंदी चढली कि ती न उतरण्यासाठी. मला नात्याची किंमत शून्य झाली. आणि मी जबाबदारी विसरलो.
माझे लग्न झाले. माझ्या पत्नीलाही माझ्या व्यसनाबद्दल माहित होते. तरी तिने माझ्याशी लग्न केले. कारण तिला आत्मविश्वास होतो कि ती मला व्यसनापासून परावृत्त करू शकेल. माझ्या पत्नीने माझे व्यसन सोडविण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. मला दोन मुले आहेत. माझ्या ह्या व्यसनामुळे त्यांच्यावरपण परिणाम होत चालला होता. हे माझ्या लक्षात येत नव्हते. मी माझ्या व्यसनामुळे माझे आई वडील, छोटा भाऊ सुद्धा गमावून बसलो आणि हळूहळू भावापासून, बहिणीपासून, माझ्या पत्नीपासून आणि समाजापासून दूर होत गेलो. आणि अशी परिस्थिती आली कि मी व्यसन करून रस्त्यावर पडत होतो. घरात भांडण करत होतो. पत्नीला मारझोड करत होतो. कधीकधी मुलांना पण मारत होतो.
२०१७ साली माझी परिस्थिती अशी झाली कि, मी जिवंत राहीन कि नाही हे सांगू शकत नव्हतो. अश्या परिस्थितीत माझ्या पत्नीने मला ‘दिशा सामाजिक सेवा संस्थेत’ व्यसनमुक्तीसाठी दाखल केले. माझ्या ह्या व्यसनामुळे मी शारीरिकदृष्ट्या कमजोर झालो होतो. माझ्या दोन्ही हातांना कंप सुटत असे. नीटसे जेवतही येत नसे, पाणी पिता येत नसे. झोपही लागत नसे. मला सतत भास होत. प्रथम मला औषध उपचार करून शारीरिकदृष्ट्या मजबूत करण्यात आले. नंतर संस्थेमध्ये चालणाऱ्या प्रोसेसमध्ये सहभागी करण्यात आले. रोजचे शेड्युल, त्यामध्ये होणारी सेशन्स हे मला सर्व नवीन होत. पण वेळोवेळी स्टाफनी केलेलं समुदेशन त्यामुळे अंतर्गत विकास होत गेला. त्यावेळी समजले कि सकारात्मक विचार काय असतात आणि नकारात्मक विचार काय असतात. माझ्यामध्ये असणारे नकारात्मक विचार सकारात्मक होण्यासाठी बराच काळ जावा लागला. आज मी ‘दिशा सामाजिक संस्थेत’ एक जबबदार स्टाफ आणि संस्थेचा कर्मचारी आहे. मी येथेच नोकरी करतो. कुटुंबापासून ५ वर्षे दूर राहिल्यानंतर मला कुटुंबाची, नात्याची आणि स्वता:चीही किमत समजली.
मी आयुष्यात जसे गमावले तसे कुणीही गमावू नये. ह्या भावनेने मी हे सामाजिक कार्य करण्याचा निश्चय केला आहे. दिशा सामाजिक सेवा संस्थेचे डायरेक्टर श्री. राजेंद्र कुऱ्हाडे, संस्थेचे सल्लागार आणि संस्थेतील स्टाफ ह्यांचा शतष: ऋणी आहे.