कल्याणच्या समाजमनावर ठसा उमटवणार्या व कल्याणमध्ये कार्यरत असणार्या संस्थांमध्ये ‘उज्वला मंडळ’ हे नाव निश्चितच अग्रक्रमाने घ्यावे लागेल. समाजोपयोगी काही विशिष्ट उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून काम करणारे हे मंडळ दमदारपणे अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. घटस्थापनेपासून पाच दिवस चालणार्या या शारदोत्सवात पहिले चार दिवस सामाजिक, वैचारिक, प्रबोधनात्मक अशी व्याख्याने आयोजित केली जातात. तर पाचव्या दिवशी दर्जेदार करमणुकीचा कार्यक्रम असतो.
उज्वला मंडळाच्या शारदोत्सवात सर्वश्री ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, मा. बाळासाहेब ठाकरे, श्री. अरुण करमरकर, श्री. नरेंद्र चितळे, श्री. चंद्रशेखर टिळक यांच्यासारख्या अनेक नामवंत व्यक्तिंनी आपली कला सादर केली आहे, आपली व्याख्याने सादर केली आहेत.
या वर्षीचा शारदोत्सव रविवार दिनांक १५ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणार आहे. त्यात सौ. अनुश्री फडणीस देशपांडे ठाणे, यांचे “तुझ्या शब्दांचे चांदणे”हा शांताबाई शेळके यांच्या साहित्यावर आधारित व्याख्यान तसेच ,”समर्थकालीन सुपर वुमन, श्री. समीर लिमये (कल्याण) यांचे व्याख्यान, तर “चला थोडं बदलूया” या विषयावर नीता माळी (ठाणे) या मार्गदर्शन करणार आहेत. “धर्म संस्कृती आणि समस्या” या विषयावर दैनिक तरुण भारतच्या उपसंपादिका श्रीमती योगिता साळवी या आपले विचार मांडणार आहेत.
व्याख्यानांचे ठिकाण अभिनव विद्यामंदिर, पारनाका, कल्याण (प.) हे असणारा आहे व वेळ सायंकाळी ५.३० ही आहे. तर शुक्रवार दि. २० ऑक्टोबर रोजी सोनिया परचुरे व सहकारी यांचा ‘भगवती’ हा नवा कोरा नृत्याविष्कार सादर होणार आहे. आचार्य अत्रे रंगमंदिरात रात्री ८.३० वाजता हा कार्यक्रम होईल.
कल्याणच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणार्या या संस्थेने सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सव या मानाच्या यशस्वी उत्सवाचे व्यवस्थापन केले आहे.
रसिकांनी या उत्सावास भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या व मार्गदर्शक सौ. नंदिनी फडके यांनी केले आहे.