महिलांचे कर्तृत्व अनेक क्षेत्रात दिसून येते. स्त्री-पुरुष समानतेची कल्पना रुजत असली तरीही, अजूनही अनेक क्षेत्रात स्त्रियांचे योगदान पुरुषांइतकेच महत्वाचे आहे. स्त्रिया घराची आणि कुटुंबाची काळजी घेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मुलांचे संगोपन, घरकाम, आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे हे स्त्रियांचे मुख्य कर्तव्य आहे. स्त्रिया कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यास मदत करतात आणि प्रेम आणि आपुलकीचे वातावरण निर्माण करतात. आजकाल, स्त्रिया शिक्षण आणि करिअरमध्येही पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी होत आहेत. अनेक स्त्रिया डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षिका, आणि इतर अनेक क्षेत्रात यशस्वीरित्या काम करत आहेत. स्त्रियांचे शिक्षण आणि करिअर हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. नारीशक्तीच्या रूपात भारतीय महिला कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची धुरा यशस्वीरीत्या पार पाडतेय. त्यामुळे महिलांचे सक्षम नेतृत्व समाजात विकसित होत आहे, ही एक आनंदाची बाब आहे. आज जागतिक महिला दिन आहे. त्यानिमिताने आपण भेटत आहोत सौ. सीमा जयंत गोखले (पूर्वाश्रमीची – सीमा आत्माराम गाडगीळ) ह्यांना.
सौ. सीमा जयंत गोखले ह्यांनी कल्याणातील पहिली प्रिंटींग प्रेस स्वतंत्ररित्या चालविली. स्वतंत्ररीत्या पहिली प्रिंटींग प्रेस चालविणाऱ्या त्या कल्याणमधील पहिल्याच महिला आहेत. विनायक प्रिंटींग प्रेसची स्थापना १९३८ साली झाली.
८ मे १९७७ साली त्यांचा श्री. जयंत गोखले ह्यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्यांना दोन मुले झाली. सारिका आणि चिन्मय. ६ मे १९८७ साली पतीच्या अपघाती निधनानंतर दोन मुले, सासू आणि सासरे ह्यांची जबाबदारी त्याच्यावर येवून पडली. सासरे श्री. जनुभाऊ गोखले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली १ जुलै १९८७ पासून प्रिंटींग प्रेसच्या व्यवसायात लक्ष घातले. मुलगा अवघा दीड वर्षांचा तर मुलगी ८ वर्षांची. सीमा ह्यांना वयाच्या २८व्या वर्षी वैधव्य आले. न डगमगता छपाईचे व्यवसायिकरित्या कोणतेही पूर्व शिक्षण नसताना घेतलेला हा एक धाडसी निर्णयच होता.
अनेक टप्पे टोमणे, ठेचा खाऊनही चिकाटीने त्याकाळी पुर्णपणे पुरूषी वर्चस्व असलेल्या व्यवसायात पाय रोवून उभी राहिली. अगदी लेबर ऑफिस, लेबर कोर्टच्या दिव्यातूनही जावे लागले. कल्याणातील SSI (Small Scale Industry) असलेली व्यवसायिकरित्या चालणारी १ली प्रिंटींग प्रेस जिद्दीने २६ वर्षे चालविली. ह्यासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले.
१. १९९४ साली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार.
२. महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे उत्कृष्ट छपाईचे दोन वर्षे पुरस्कार प्राप्त.
३. National International Compendium दिल्ली ह्यांचा लाइफ टाईम अवार्ड.
४. जायंट ग्रुप सहेली कल्याण तर्फे बिझनेस वूमन पुरस्कार.
५. रोटरी क्लब कल्याण तर्फे व्होकेशनल एक्सलंस पुरस्कार.
६. बरीच वर्षे ८ मार्च महिला दिनानिमित्त विविध संस्थांकडून विशेष पुरस्कार.
७. कल्याण महिला मंडळ, उत्कर्ष मंडळ कल्याण ह्यांच्या तर्फे गौरविण्यात आले.
८. अनेक TV Channels तर्फे सत्कार.
९. विविध राजकीय पक्षांकडून सन्मान.
१०. नाशिक येथील पत्रकार अवधूत ह्यांनी सत्कार केला व सीमा गोखले ह्यांच्या हस्ते त्यांची आई सुलोचना ह्यांचा सत्कार करविला.
११. महिला सहकारी उद्योग मंदिराने मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या महिला मेळाव्यात व्याख्याती म्हणून प्रिंटींग विषयावर व्याख्यान दिले आणि संस्थेने सन्मानितही केले.
१२. अनेक मासिकांमधून परिचय प्रसिद्धी.
१३. कल्याण पूर्व मधील सेंट जुड्स अलुमनि एज्युकेशन असोसिएशन कडून रियल लाइफ सुपर वुमन अवार्ड ने सम्मानित केले आहे.
१४. इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१४ तर्फ़े उत्कृष्ट सहकार्य व सेवा बद्दल सम्मानित केले
२०१९-२०साला साठी.
१५. ज्येष्ठ नागरिक संघ कल्याण ने सत्कार केला.
कार्याचा आढावा:
१. विविध सामाजिक संस्थांमध्ये सामाजिक ऋण फेडणे ह्या उद्देशाने त्या कार्यरत आहेत.
२. महिला सहकारी उद्योग मंदिर – १४ वर्षे सेक्रेटरी व ६ वर्षे अध्यक्ष. नंतर कार्यकारिणी सदस्य.
३. उत्कर्ष मंडळ – कार्यकारिणी सदस्य, आजीव सदस्य.
४. सार्वजनिक वाचनालय, कल्याण – १९ वर्षे कार्यकारिणीवर कार्यरत.
५. चित्पावन संघ, कल्याण – कार्यकारिणी सदस्य.
६. स्त्री शिक्षण मंडळ – ८ वर्षे कार्यकारिणीवर.
७. चित्पावन संघ कल्याण, इनर व्हील क्लब, कल्याण – कार्यकारिणीवर २ वर्षे, सध्या माजी प्रेसिडेंट.
८. सध्या इनर व्हील डीस्ट्रीक तर्फे सुरक्षित बचपन या विषयाची फेलिसिटेटर म्हणून वर्कशॉप घेतात.
तर अश्या सौ. सीमा जयंत गोखले ह्यांच्या कर्तृत्वाला ग्लोबल कल्याणतर्फे सलाम.