कल्याणविषयी माहिती:
कल्याण म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. कल्याण हे पुरातन काळापासून पैठणकडे जाणाऱ्या नाणेघाट मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण होते. बहामनी राज्याच्या स्थापनेनंतर कल्याण बहामनी राज्यात समाविष्ट झालॆ. बहामनी राजवटीची शकले उडाल्यानंतर निजामशाही सुलतान अहमदशहा (पहिला) याने कल्याण आणि इतर मुलुख जिंकून घेतला. नंतरच्या काळात विजापूरचा आदिलशहा व मुघल यांनी निजामशाहीविरुद्ध संयुक्तपणे आक्रमण करून निजामशाही संपवली आणि कल्याण बंदर आदिलशहाच्या ताब्यात गेले. याच आदिलशहाचा कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये कल्याणचे स्थानही महत्त्वाचे होते. ब्रिटिश काळात उत्तर व दक्षिणेच्या भागात जाणाऱ्या रेल्वेमार्गाचे कल्याण हे महत्त्वाचे जंक्शन झाले व ते महत्त्व आजमितीलाही टिकून आहे. या भागात विस्तारणाऱ्या औद्योगिक क्षेत्रांमुळे मुंबईखालोखाल हा परिसर बहुभाषक होत चालला आहे. कल्याण व डोंबिवली या दोन शहरांची मिळून महानगरपालिका सन १९८२मध्ये अस्तित्वात आली.
नावाप्रमाणे येथे येणाऱ्या सगळ्यांचे कल्याण करणारे हे गाव ऐतिहासिक काळापासूनचे एक प्रसिद्ध बंदर होते. उल्हास नदीच्या खाडीतीरावर असलेले एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून याला कुशाण–सातवाहन काळात महत्त्व होते. येथून रोमपर्यंत व्यापारी संपर्क होता. गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजाच्या शासन काळात कल्याणचा रहिवासी आनंदपुत्र उपासक अपरेणू याने कान्हेरी येथे लेणी व मंडपदान दिल्याचा शिलालेख उपलब्ध आहे. कल्याण येथील संपन्न व्यापारी मोठ्या प्रमाणात दानधर्म करत असे, हे कान्हेरी व जुन्नर येथील शिलालेखात दिसून येते. वेणहुनंदि व विष्णूनंदी (पिता) यांच्या कुटुंबीयांनी, तसेच सुवर्णकार ‘स्वामीदत्त’(शिवमित्र) यांनीही देणगी दिल्याचे उल्लेख सापडतात.
सातवाहन काळात या भागात बौद्ध धर्मास मोठा आश्रय होता. तसेच वैदिक धर्मालाही महत्त्व वाढू लागले होते, हे नाणेघाट येथील शिलालेखांतून दिसून येते. व्यापाऱ्यांनी स्तूप, चैत्य, या परिसरातील जलकुंड, बसण्यासाठीचे बाक, पथ यांच्या निर्मितीसाठी दान दिलेले दिसून येते. कल्याणलगत असलेल्या गंधारिका (गांधारी) भागात निवास व भोजन चतुःशाला यांसाठीही दान दिल्याची नोंद आढळते. यामुळे कल्याण परिसराच्या वैभवाची साक्ष मिळते.
माहिती व संकलन: श्री. माधव विद्वांस । ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com