140 कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा होतोय. चांद्रयान 3 (chandrayaan3) ने चंद्राच्या दक्षिण भागातील यशस्वी लँडिंग केले. आणि संपूर्ण देशभरात आनंदाची एकच लहर पसरली. या ऐतिहासिक यशाबद्दल कल्याण आणि डोंबिवलीतही नागरिकांनी जोरदार सेलिब्रेशन केल्याचे दिसून आले. (Chandrayaan 3 soft landing: Anandotsav was also celebrated in Kalyan Dombivli )
भारतीय अंतराळ संस्था अर्थातच इस्रो (ISRO) च्या या यशाच्या पार्श्वभूमीवर कल्याणात माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. कल्याण पश्चिमेच्या पारनाका परिसरात असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आणि पेढे वाटून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी नागरिकांसमवेत आपला आनंद साजरा केला. विशेष म्हणजे या आनंदोत्सवात शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले. भारतच्या या ऐतिहासिक यशाबद्दल भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
ही अतिशय अवघड मोहीम भारताने आणि भारतीय शास्त्रज्ञांनी अतिशय सहजपणे पूर्ण करत आपल्या बुद्धीची चुणूक संपूर्ण जगाला दाखवून दिल्याची भावना यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली.
डोंबिवलीतही करण्यात आला आनंदोत्सव…
चंद्राला गवसणी घालण्याचं भाग्य जगात भारताला सर्वप्रथम मिळवून देणाऱ्या सर्व शास्त्रज्ञ बंधू-भगिनींचे शिवसेना डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आणि शिवसैनिकांच्या वतीने कौतुक करण्यात आले.
चांद्रयान-३ च्या चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील यशस्वी सॉफ्ट लँडिंगच्या निमित्ताने डोंबिवली शहरातील समस्त पदाधिकारी, नगरसेवक आणि शिवसैनिकांनी शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा केला. चांद्रयान-३ च्या या यशस्वी लँडिंगबद्दल ढोल-ताशा, फटाके वाजवून, पेढे वाटून राष्ट्रभक्तीपर गीतांच्या तालावर राष्ट्रध्वज खांद्यावर घेऊन जल्लोष साजरा करण्यात आला.
चांद्रयान-३ च्या चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगच्या क्षणाची सर्व जगाला प्रतीक्षा होती परंतु आज २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग झाले आणि चंद्रावर देखील भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेल्याची भावना शहरप्रमूख राजेश मोरे यांनी व्यक्त केली.