कल्याण दि.11 नोव्हेंबर :
सुप्रसिद्ध गायक नचिकेत लेले, जगदीश चव्हाण, सायली महाडीक यांनी गायलेली अवीट गोडीची गाणी… त्यावर कथ्थक नृत्यांगना आदिती भागवत यांनी सादर केलेले अप्रतिम नृत्य आणि त्यासोबतीला ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडीलकर यांच्या अमोघ वाणीतील सात्विक निवेदन. अशा अमृततूल्य क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आज कल्याणकरांना लाभले. निमित्त होते ते इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण, केडीएमसी, कल्याण संस्कृती मंच आणि अनंत वझे संगीत, कला क्रीडा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे.
कथ्थक नृत्यांगना अदिती भागवत यांच्या अतिशय सुंदर अशा शिववंदना नृत्याने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग सादर झालेल्या एकाहून एक सरस अशा सप्तसुरांच्या सुरेल, अवीट मैफिलीत कल्याणकर नागरिक भारावून गेले. सायली महाडीकने आपल्या अतिशय कोमल स्वरांत सादर केलेली ज्योती कलश छलके, नैनो मे बदरा छाये, आली माझ्या घरी ही दिवाळी, आदिती भागवत यांच्या नृत्याची साथ लाभलेले मोहे रंग दे लाल या गाण्यांनी तर जगदीश चव्हाणच्या अवघे गर्जे पंढरपूर या अभंगासह ए जिंदगी गले लगा ले, जेव्हा तुझ्या बटांना या गाण्यांसह सादर केलेल्या मेडलीची प्रेक्षकांना भुरळ घातली. तर सायली,जगदीश आणि आदिती यांनी रचलेल्या सुमधुर पायावर कल्याणकर नचिकेत लेलेने कळस रचण्याचे काम केले. देवा श्री गणेशापासून सुरुवात करत मग नचिकेतने रसिकांना दर्दे दिल दर्दे जिगर, बचना ए हसिनो, आ..जा आ..जा में हू प्यार तेरापासून ते मधुबन मे राधिका नाचे रे, एक चतुर नार, लागा चुनरी मे दागपर्यंतच्या गाण्यांची सांगीतिक मेजवानी पेश केली. आणि अख्ख्या सभागृहाला आपल्या तालावर गाण्या – नाचण्यास भाग पाडले. आणि या सर्वांवर कडी केली ती ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडीलकर यांच्या निवेदनाने. यावेळी त्यांनी जुन्या काळातील एक एक आठवणींना उजाळा देत देत आपल्या अमोघ आणि सात्विक वाणीने रसिकांच्या थेट हृदयाला स्पर्श केला. आणि कल्याणकरांना यंदाच्या दिवाळीतील या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक अविस्मरणीय अशी मर्मबंधातील ठेव गवसली. कल्याण आयएमएचे माजी अध्यक्ष आणि नववर्ष स्वागत यात्रा समन्वयक डॉ. प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम प्रत्यक्षात उतरला. तर आगामी गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेचे यजमानपद यंदा आयएमए कल्याणकडे असून या स्वागत यात्रेमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ. प्रशांत पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाला केडीएमसीचे आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे, सचिव वंदना गुळवे, जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, कल्याण संस्कृती मंचाचे ॲड. निशिकांत बुधकर, डॉ. दीपक वझे, डॉ. प्रताप पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयएमए कल्याणच्या अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे, उपाध्यक्ष डॉ. सुरेखा इटकर, सचिव डॉ. विकास सुरांजे यांच्यासह डॉ. अश्विन कक्कर, डॉ. प्रशांत खताले, डॉ. सोनाली पाटील, डॉ. श्रेयस गोडबोले, डॉ. सोनाली परळीकर, डॉ. शुभांगी चिटणीस, डॉ. मंजू राठोड आदींनी विशेष मेहनत घेतली.