ज्ञानकर्मी जे. के. पानसरे यांच्या चौदाव्या स्मृतिदिनानिमित्त, अनंत वझे संगीत, कला व क्रीडा प्रतिष्ठान, कल्याण यांच्यातर्फे “कथ्थक रंग” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्याच्या सुप्रसिद्ध नृत्यांगना ऋजुता सोमण यांचा ‘कथ्थक रंग’, तसेच अनंत वझे संगीत विद्यालयाच्या शिक्षिका सौ. अमृता नवरे-साळवी आणि विद्यालयाच्या विद्यार्थिनी यांचा “कथ्थक संध्या” ह्या नृत्य-संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्ञानकर्मी जे.के. उर्फ दादासाहेब पानसरे यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान होते. ‘जे. के. पानसरे एज्युकेशनल ट्रस्ट’चे ते संस्थापक होते. डोंबिवली येथे सुरवातीला कोचिंग क्लासेस, त्यानंतर मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यांनी सुरू केल्या. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे येथे इंग्रजी माध्यमाचे पहिले डी. एड. कॉलेज दादा साहेबांनी सुरू केले. अनंत वझे संगीत, कला व क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेचे ते मार्गदर्शक होते.
ऋजुता सोमण या गुरू पंडिता डॉक्टर रोहिणी भाटे यांच्या शिष्या असून, त्या नृत्यालंकार आहेत व त्यांनी नृत्य विषयातून एम. ए. पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले असून, त्यात ‘सींगारमणी’, ‘श्री. नंदिनी पुरस्कार’, ‘डॉक्टर विजया भालेराव कथ्थक नृत्य पुरस्कार’ उल्लेखनीय आहेत. त्यांनी देश-विदेशात अनेक कार्यक्रम केले असून, भारतीय शास्त्रीय कथ्थक नृत्याला विशेष स्थान मिळवून दिले आहे. तसेच त्या आपल्या ज्ञान दानातून अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडवित आहेत.
गेली चौदा वर्षे विविध कार्यक्रमांचे आयोजन वझे संगीत प्रतिष्ठानद्वारे केले जाते. “कथ्थक रंग” व “कथ्थक संध्या” या कार्यक्रमाबरोबरच विद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार असे यंदाच्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका स्वप्नगंधा करमरकर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सर्वांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन, अनंत वझे संगीत, कला व क्रीडा प्रतिष्ठान, कल्याण चे विश्वस्त डॉ. दीपक वझे, डॉ. गौरी वझे, डॉ. प्रताप पानसरे व डॉ. ईशा पानसरे यांनी केले आहे.
ठिकाण :- शारदा मंदिर माध्यमिक शाळा सभागृह, लाल चौकी, आग्रा रोड कल्याण – पश्चिम, ४२१३०१.
दिवस:- शनिवार
दिनांक:- २६ ऑगस्ट २०२३
वेळ:- संध्याकाळी ६ ते ९