श्री. विजय सातपुते कल्याणमध्ये कवी चित्रकार म्हणून ओळखले जातात.. सेंट्रल रेल्वेज मधून ते इंजिनिअर म्हणून निवृत्त झाले. कविता लिहिणे हे त्यांचं पॅशन आहे. त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांना राज्य स्तरीय काव्य स्पर्धेत त्यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले आहे. विजय सातपुते ह्यांनी प्रसिध्द कवयत्री ज्ञानपिठ पारितोषिक विजेत्या अमृता प्रीतम यांच्या ऐंशी कवितांचा त्यांनी अनुवाद केला आहे.
चित्रकारिता त्यांच्या घराण्यात परंपरेने चालत आली आहे. अर्कचित्र हया शैलीत त्यांचे विशेष प्राविण्य आहे. १९९६ साली हिन्दुस्थान टाईम्सने आयोजित केलेल्या अर्कचित्र स्पर्धेत (अखिल भारतीय पातळीवर ) त्यांना यश मिळाले आहे. ते स्वत: ‘खोखो’ या देशी खेळात राष्ट्रिय स्तरावरील मातब्बर खेळाडू होते . तसेच त्यांनी प्रशिक्षीत केलेले श्री.अनिल तुपकर, श्री राजन गांधी, श्री . किशोर गजकल, श्री. राजेंद्र सकपाळ हे खेळाडू राष्ट्रिय पातळीवर तसेच आंतर महाविद्यालयीन पातळीवर खेळले आहेत. श्री. विजय सातपुते यांना काव्य साहित्य तत्वज्ञान यांत विशेष रूची असून ते बहुश्रूत वाचक आहेत.
श्री. विजय सातपुते यांनी रेखाटलेली काही चित्रे:
श्री. विजय सातपुते यांनी रेखाटलेली अर्कचित्रे:
श्री. विजय सातपुते ह्यांच्या काही निवडक कविता:
कवितेचे हात
तुझ्यासह निघून गेलेले
रंगभरल्या क्षणपळांचे ते दिवस
आता परत येणार नाही
सुंदर नव्हतो मी
पण तुझ्या बोलांनी किती
मोहर मनावर फुलायचे
ओळीतील शब्दा शब्दांवर
तुझ्या ओठांचे मध लागायचे
आता परत फुलून येणार नाहीत
ते कळ्यां फुलांचे दिवस
आत बाहेर झरणार नाहीत
भिजल्या भावनांचे झरे
किती सोसल्या नकारांचे
कळ लावणा-या अभावांचे
स्पष्ट दिसताएत आलेख
मनाच्या सुजाण पडद्यावर
असे असुनही कसे पोहचतात
खुणा तुझ्या ओढाळ मनाच्या
दूर क्षितीज रेषेेवर
उरल्या सुरल्या जलधारा
साठवून ठेवणा-या धूसर मेघांना
कशी लागते व्याकुळ ओढ
कसा झिरपतो हा विश्वास
आतल्या संभ्रमीत अवकाशात
आणि तरीही
पापण्यांच्या आत थबकलेले
अश्रुंचे दाट ओहोळ
अर्ध मिटल्या पापण्यांवर
झुकलेले आभाळ सर्द
अन् प्रयासाने
मनावर फिरवलेला संयमाचा
गडद रंगी कुंचला
दिसण्याच्या पलिकडेही केवळ
तुझी असण्याची ऊब
पुरते आहे माझ्या प्राणांना
धरून ठेवताएत
अशक्त होत जाणारे श्वास
आणि कविता लिहिणारे
माझे सृजनशील हात ।।
—————————————————————————————
विठ्ठला
विठ्ठला , तुझ्या दाराशी येऊन
इथेच थबकलो आहे
येतांना कवितेचा कागद
सवे घेऊन आलो होतो
म्हंटल , आल्यावर सगुण तुझे रुप
करावं कवितेत साकार ।
इथे आलो तर ही गर्दी
उसळलेली , भक्तीने भिजलेली
हजारो घामेजली कपाळं
तुझ्या नावाची टिळा लावलेली
कुठे भक्तांनी धरलेले रिंगण
धूळ माखल्या पावलांचे नर्तन
कुठे मिचमिचत्या डोळ्यांत
तुझ्या रुपाचे पावन दर्शन
मंदिराच्या पायरीपासून फुटलेली
रांग पुढे क्षितिजान्त पसरतांना
सकाळचा उभा दर्शनेच्छू
संध्यासमयी मंदिरात शिरतांना ।।
मिनिटभराचे दर्शन आणि
पुढच्याच क्षणी भक्त
बाहेरच्या उदंड जनसागरात
विलीन होतांना रिक्त
तुझे रूप डोळाभर
आठवून आठवून साठवतांना
थकल्या श्रांत गळ्यात
विठ्ठलाचे नांव जपतांना
घराकडे परतीची पाऊले
जडशीळ होत जातांना ।।।
मी तिथेच थांबलो
झाडाखाली झोपलो निभ्रांत
ठेवून कागद उशाशी
विठ्ठलाचे करूनी चिंतन मनात
पहाटेच साक्षात्कारी जाग आली
कागदाकडे पाहिलं ——-
मूर्तिमंत कविता तुझ्या नावानिशी
झाली होती साकार ।।।।
माझा विठ्ठल
कवितेच्या शब्दांत बहरलेला
माझी पंढरी
कवितेच्या ओळीतून गहिवरलेली
माझी चंद्रभागा
कवितेच्या लयीतून वाहणारी
माझी वारी
कवितेच्या आशयातून पुढे सरकणारी
विठ्ठला ! तुझे दर्शन झाले
गळाभेट घडली
माझी कविता कळसास पोहचली ।।
—————————————————————————————
मुकुट
कुणीतरी मुकुट ठेवलाय
भर शहरात रस्त्याच्या मधल्या चौकात
तो नव्हता हिरामाणकांनी गढवलेला
कातरलेल्या हिरव्या धारदार पानांनी
मुकुट होता मढविलेला
होते त्याचे अस्तित्व सामान्य तरी वेगळे
त्यानं लावलं सगळ्या चराचराला
चौक , रस्ते , वाहने टांगे रिक्षा
दुकानातल्या वस्तू , धनधान्ये
खाण्यातील दाखवण्यातील बाळगण्यातील
महत्वाचे बिनमहत्वाचे क्षुद्र अतिक्षुद्र
सजीव निर्जीव वस्तुंना
चौकाभोवती फेर धरायला
सगळं चराचर त्याच्यापर्यंत पोचलं
त्याला कह्यात घ्यायला
तर ते सपशेल उताणं पडलं
ते झालं पायाशी साचेबंद
मुकुट होताच तसा चिरेबंद
चौथ-यावरती शानदार
त्याची हिरवी प्रभा अशी उंच हवेत
लहरत राहिली जणू स्वयंसिध्द चंद्र
त्यानं घेतला सर्वत्र कब्जा
पसरली त्याची हुकूमत जगावर
त्यानं दिला न प्रकाश न अंधार
त्यानं दिला न पक्षी न गाणे न अवकाश
तरीसुध्दा व्यापला अख्ख्या समष्टीत
शब्दातून उगवणा-या अर्थाप्रमाणे ।
—————————————————————————————
हिरोशिमा
कुणीतरी आग ओतली आहे
त्या बेसावध भूमीवर
जणू एकाच वेळी शेकडो सुर्य
आग खावून कोसळले .
बघता बघता एक अख्ख शहर
आगीच्या भक्षस्थानी पडलंय
एक नांदती बोलती संस्कृती
गडप झालीय राखेच्या ढिगा-यात
पानाफुलांचे हिरवे पिवळे घोस
फुलपाखरांचे खुशाल बागडणे
हिरव्या वनराईचा हिरवा शब्द
वृक्षावरील गजबजता पर्णसंभार
शाळांतील चिमण्यांचा चिवचिवाट
बागेतील हसरी बोलती पाखरे
कारखान्यातील निर्मितीचा धूर
हितगूज करणारे गृहसंकुलांचे वृंद
सगळं कसं भस्मसात झालंय
ह्या भयाण जीवघेण्या तडाख्यात
एक भयाण शांतता माखलीय
ह्या सर्वदूर आसमंतात
राखेचे प्रचंड ढिगारे भोवती
जणू मृत अवशेषांचे कहर
दूरदूरपर्यंत धगधगते पठार
आत खोलवर जीवजंतूंचा संहार
वाटले आता संपली उद्याची आशा
गाडली गेली जगण्याची भाषा
तेवढ्यात दिशांच्या कोनातून
एक आवाज हलकासा आलाय
राखेच्या थराखालून एक चिमुकले
कोवळे हिरवे तृणांकूर डोकावतेय
नकळत वा-याच्या लहरीवरती
गाणे सृजनाचे हळुवार पसरतेय
अद् भूत चैतन्याच्या प्रवाहाकाठी
हिरोशिमा पुन्हा नव्याने वसतेय ।।
—————————————————————————————
मायेची तगर
परसात उभी तगर अशी हिरवीगार
शुभ्र फुलांची आरास लेऊन अंगभर
नांदत्या घराची सून देखणी सकवार
उभी लाजरी लजवंती अशी दारावर ।१।
ठेंगणी ठुसकी , बांधा तो अटकर
हिरव्या पर्णांवर लोभस ते दहिवर
सुस्नात तजेलदार नाजूक अलवार
भरल्या गळ्यात खुलते काळे सर ।२।
प्रत्येक ऋतूत बहरून मस्त फुलते
ऊन कोवळे सोनेरी अंगावर झेलते
हिरवी सावळी लेणी अपार सुंदर
पोपटी शालू खुले चांदण्याची जर ।३।
केळीच्या बुंध्याशी पाणी झुळझुळते
आंब्याच्या फांद्दयात पडछाया हालते
अंगणात ओल्या हळदीच्या पावलांनी
मोहरून तगर अंगभर उभी थरथरते ।४।
मिरगातील पाऊस बरसे अंगणभर
माहेरवाशीण जोजवते मायेची तगर
कौलारू घर टपटप गळती पागोळ्या
डोळ्यांत कां ग आसवांच्या रांगोळ्या ।५।
घर सारे बुडते ऊरे आठवणींचा झोका
कित्येक चाफे फुललेत त्यानंतर आता
पानांआड अजून फुगून भिजली पाखरे
मावळतीच्या ऊन्हात तगर एकटीच झुरे ।६।
—————————————————————————————
आकान्त
परत एकदा आकाशाने पंख पसरले
युगांयुगांचे संचित धरतीवर सांडले
तेजाचा लाल गोळा ढगांच्या पाठीवरून
घरंगळत क्षितीजाच्या कडेवर अडकला
तेव्हा मनुजाच्या थरथरत्या हातातले
प्राक्तनाचे फळ पिकून बेवारस झाले .
अनाहूत स्वातंत्र्याचे गीत गाणारे पक्षी
सागराच्या लाटेवर विखुरलेले आपुलेच
पंख मोजीत असतां किना-यावरची झाडे
अगतिकपणे हिरवे अश्रू ढाळतात
अशावेळी मनुजाचे मन दाही दिशांना धावते
हातातले प्राक्तनाचे फळ त्याला कुठेकुठे नेते
अज्ञाताच्या गूढ काळोखात त्याच्या
इच्छांचे हात लवलवू लागताच , त्याच्या
अटळ भाग्याचे सनातन क्रूस त्याच्या
भाळावर खोदले जातात
मग उरतात दिशाहीन धावणारे अन्तहीन रस्ते
जे भूतकाळाचा श्वास घेत नाही आणि ……….
भविष्याचा उच्छवासही टाकत नाही
उरतो फक्त वर्तमानाचा न संपणारा आकान्त .