रवीन्द्र दामोदर लाखे हे कल्याणमधील सर्वांना सुपरिचित असे प्रसिद्ध कवी आणि रंगकर्मी आहेत. आजपर्यंत त्यांचे खूप काव्य संग्रह प्रसिद्ध झाले आहेत आणि त्यांना अनेक पारितोषिकेसुद्धा मिळाली आहेत. त्यांच्या सत्यकथा, मौज, हंस, अनुष्टुभ, खेळ, मटा इत्यादीअनेक वाङ्मयीन नियतकालिकांतून कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांचा पहिला कविता संग्रह: जिव्हार ( मौज वितरण) १९८३ साली प्रकाशित झाला. त्यांचे २०१८ मध्ये ‘संपर्काक्षेत्राच्या बाहेर’ आणि ‘अवस्थांतराच्या कविता’ हे दोन कावसंग्रह प्रकाशित झाले. त्यापैकी ‘संपर्काक्षेत्राच्या बाहेर’ या कावसंग्रहाला ‘कवी भूजंग मेश्राम पारितोषिक’, ‘आपटे वाचन मंदिर इचलकरंजी पुरस्कृत कवी इंदिरा संत पारितोषिक’, कवी श्रीधर शनवारे पारितोषिक मिळाले आहे तर ‘अवस्थांतराच्या कविता’ या काव्य संग्रहाला ‘राज्य शासनाचे कवी केशवसुत पारितोषिक २०१८’ पारितोषिक मिळाले आहे. त्यांचे कोनटिकी, कविता, संवाद, अभिधा या कवितेला वाहिलेल्या काही लघु अनियकालिकांचं संपादन आहे.
रवीन्द्र दामोदर लाखे यांनी ग्रंथाली प्रकाशित ‘चिं. त्र्यं. खानोलकर:एक ललित चरित्र’ ह्या पुस्तकासाठी लेखक दीपक घारे ह्यांना संशोधन साहाय्य केले. तसेच त्यांनी अल्बर्ट कामू ह्यांच्या कॅलिग्यूला ह्या नाटकाचा अनुवाददेखील केला आहे. त्यांनी भयस्वप्नाच्या अरण्यात हे स्वतंत्र नाटकही लिहिले आहे. त्यांचा अनेक वाङ्मयीन परिसंवादातून सहभाग आहे.
ते गेली ४० वर्ष प्रायोगिक नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ‘मितीचार’ ही स्वत:ची नाट्यसंस्था आहे. ललित प्रभाकर, मयूर खांडगे, आदिती सारंगधर हे कलाकार मितीचार मधूनच घडले. त्यांनी अनेक कार्यशाळांमधून नाट्यनिर्मिती केली आहे. धर्मवीर भारती विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, श्याम मनोहर, चं प्र देशपांडे आदी लेखकांची नाटके दिग्दर्शित केली आहेत. एकूण संख्या २०-२१ भरेल. २५ एकांकिका दिग्दर्शित केल्या आहेत.
पारितोषिके आणि सन्मान:
राज्यनाट्य स्पर्धामधून मिळालेली पारितोषिके:
- सर्वोत्कृष्ट अभिनेता १९७५
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक १९८९, १९९७,२००४,२००५,
- सर्वोत्कृष्ट नेपथ्य: २०१५
इतर सन्मान
- कै. नंदकुमार रावते पारितोषिक
- विलासराव देशमुख फौंडेशन पारितोषिक
- कुसुमाग्रज प्रतिष्ठान पारितोषिक
- सोविएट कल्चर पारितोषिक
- कै रामभाऊ पाटकर पारितोषिक
- गोपीनाथ सावकार पारितोषिक
- काशिनाथ घाणेकर पारितोषिक
- अल्फा गौरव आणि महाराष्ट्र टाईम्स सन्मान २००३
- अनेकदा झी, मटा नॉमीनेशन्स
‘प्रेमच म्हणू ह्याला हवं तर’ ह्या नाटकाचा राष्ट्रीय नाटक शाळा दिल्ली ह्यांच्या १२व्या भारत रंग महोत्सवात समावेश. अखिल भारतीय नाट्य परिषदे तर्फे प्रायोगिक रंगभूमीवरील योगदानासाठी सन्मान मिळाला आहे. त्यांनी ‘द ब्लॅक शीप’ ह्या लघु चित्रपटातून अभिनय केला होता. सदर चित्रपट ‘कांस चित्रपट महोत्सवात’ निवडला गेला होता. त्यांनी २०१५ मध्ये ‘रंगकमळ’ ह्या ध्वनिफितीचे दिग्दर्शन केले होते. सदर ध्वनिफीत सुप्रसिद्ध लेखिका कमल देसाई ह्यांच्या कथांची आहे.
त्यांची अनेक साहित्य अकादमी मधून भाषणे झाली आहेत व परिसंवादात भागही घेतला आहे. ‘अगदीच शून्य’ हे नाटक काळा घोडा फेस्टिवल मध्ये सन्मानित केले गेले होते. तसेच ‘खानदेश नाट्यमहोत्सवातही’ सन्मानित केले गेले होते. ‘एन सी पी ए ता झेस्ट फेस्टिवल’ मध्ये सादर केले गेले होते. तसेच त्यांनी ‘An interview with Mr Chacko” ह्या विलास सारंग ह्यांच्या कथेवर आधारित लघु चित्रपटातून प्रमुख भूमिकासुद्धा केली आहे.