जय श्रीराम
रामनवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्री राम याचा पुर्थ्वी वर जन्म घेण्याचा हा दिवस, खरतर प्रभू राम म्हणजे विष्णूचे सातवे अवतार, विष्णू ने अनेक अवतार धारण केले ज्या ज्या वेळी या पृथ्वी वर अन्याय आणि अत्याचार च साम्राज्य वाढलं, अधर्म ज्या ज्या वेळी या पृथ्वी वर वाढला तर या अधर्माची साम्राज्य नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पूणर स्थापना करण्यासाठी विष्णूनी अनेक अवतार घेतले आणि त्यातील सातवा अवतार म्हणजे प्रभू श्री रामाचा अवतार.
रामनवमीचा इतिहास
अयोध्येचा राजा दशरथ याला कौसल्या, सुमित्रा व कैकेयी अशा तीन राण्या होत्या; पण मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. एकदा दशरथ राजा शिकारीला गेला असताना रात्रीच्या वेळी तलावाच्या काठी बसला होता. तेव्हा श्रावण नावाचा ब्राह्मणकुमार आपल्या वृद्ध आई-वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन निघाला होता. आई-वडिलांना तहान लागल्यामुळे तो पाणी घ्यायला तलावापाशी आला. दशरथाला केवळ आवाज ऐकून अचूक बाण मारता येत असे. श्रावणाचा तलावातील पाणी घेण्याचा आवाज ऐकून दशरथाने त्या दिशेने बाण मारला. तो श्रावणाला लागला आणि तो मरण पावला. त्याच्या आई-वडिलांनी दुःखाने प्राण सोडले व मरता मरता राजा दशरथाला शाप दिला की, तूही पुत्रशोकाने प्राण सोडशील. राजा दुःखी होऊन परत आला आणि त्याने आपले कुलगुरू वसिष्ठमुनी यांना सर्व हकिकत सांगितली.
वसिष्ठमुनींनी दशरथाच्या हातून नकळत घडलेल्या पापाचा दोष जाण्यासाठी त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करवला. त्यानंतर त्यांनी ऋष्यशृंग ऋषींना बोलावून त्यांच्याकडून पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केला. तेव्हा अग्निदेवाने प्रसन्न होऊन राजाला प्रसाद दिला. तो त्याने कौसल्या, सुमित्रा व कैकयी या आपल्या तीन राण्यांना दिला. त्या प्रसादाने त्यांना चार मुलगे झाले. थोरली राणी कौसल्या हिला जो मुलगा झाला, तो श्रीराम. सुमित्रेचा लक्ष्मण नि कैकयीचे भरत व शत्रुघ्न.
मोठे झाल्यावर श्रीराम वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह चौदा वर्षे वनवासाला गेले, ही कथा सर्वांना माहीत आहेच. त्यानंतर दशरथाचा पुत्रशोकामुळे मृत्यू झाला.
वनवासात असताना रावणाने सीतेला पळवून नेले, तेव्हा श्रीरामांनी वानरसेनेसह लंकेवर चालून जाऊन युद्धात रावणाचा वध केला व आपले अवतारकार्य पूर्ण केले.
श्रीराम हे भारतवासीयांचे फार आवडते दैवत आहे. श्रीराम हे एक आदर्श पुरुष होत. श्रीरामांना मर्यादापुरुषोत्तम असेही म्हणतात. मातृ-पितृभक्ती, बंधुप्रेम, सत्य-वचनाचे व्रत, प्रजाप्रेम असे अनेक आदर्श गुण त्यांच्यामध्ये होते. ते एकवचनी होते. त्यांच्या राज्यातील प्रजा अत्यंत सुखी आणि समाधानी होती. म्हणूनच आदर्श राज्याला ‘रामराज्य’ असे म्हणतात.
श्रीरामांचा आदर्श आपल्या मुलांसमोर असावा म्हणून मुलांना रामायणातील कथा सांगतात. रोज संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र त्यांच्याकडून म्हणवून घेतात. श्रीरामाच्या या महिम्यामुळेच आपण सारे उत्साहाने आणि भक्तीने रामनवमी साजरी करतो. लोक याच रामनामाने एकमेकांना अभिवादन करतात व म्हणतात ‘राम राम!’
कल्याणमध्ये ह्या वर्षी म्हणजे २०२३ ला रामनवमी उत्सव मोठा दिमाखात साजरा केला गेला. श्रीरामांच्या पालखीबरोबर चित्ररथाचेही खास आकर्षण होते.
ग्लोबल कल्याण – रामनवमी २०२३ – काही निवडक दृश्ये
ग्लोबल कल्याण – रामनवमी २०२३ – काही निवडक व्हिडिओ
रामनवमी २०२३ – या गाण्यावर एकाच वेळी नाचले हजारोजण