होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी कल्याण डोंबिवलीकरांचे अनेक वेगवेगळे प्लॅन्स बनत असताना कल्याणच्या वाडेघर परिसरात झालेल्या एका अनोख्या होळीने सर्वांचीच मनं जिंकली. निमित्त होते ते वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी अनुबंध संस्थेने आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक रंगपंचमीचे.(Seven-colored joy appeared on the faces of these underprivileged children at the brick kiln; A unique Holi organized by the contract organization)
वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची पूर्ण ऊर्जा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच निघून जाते. त्यात मग सणवार काय आणि सामान्य दिवस हे दोन्ही त्यांच्यासाठी एकच. कारण राब राब राबल्याशिवाय मजुरी मिळणार नाही आणि मजुरी मिळाली नाही तर मग उपासमार ही ठरलेलीच. अशा परिस्थीतीत त्यांना मुलांकडे पाहायलाही वेळ नसतो, तर आपल्या मुलांची हौसमौज म्हणजे तर त्यांच्यासाठी दिवास्वप्नच.
या पार्श्वभूमीवर कल्याणातील वंचित मुलांसाठी गेल्या दशकभरापासून कार्यरत असलेल्या अनुबंध संस्थेतर्फे कल्याण पश्चिमेच्या वाडेघर परिसरात असलेल्या आमणे पाडा येथील वीटभट्टीवर पर्यावरणाचे भान राखून आणि सुरक्षित सुके रंग वापरून ही पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. आणि अतिशय बेरंग आयुष्य जगणाऱ्या या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर सप्तरंगी आनंद फुलवला. ही होळी खेळत असताना या चिमुरड्यांचा आनंद अक्षरशः गगनात मावेनासा झालेला. जणू काही आपल्या या इवल्याशा हातांमध्ये केवळ रंगच नाही तर सप्तरंगी इंद्रधनुष्यच सामावल्याची भावना त्यांच्या अंतरंगात उमटली. अनुबंध संस्थेचे सूर्यकांत कोळी आणि प्रभाकर घुले यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अतिशय खडतर परिस्थितीत राहणाऱ्या या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर अनुबंध संस्थेने फुलवलेल्या या सप्तरंगी आनंदाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही की त्याचे मोल तर अजिबात केले जाऊ शकत नाही. त्यामूळे अनुबंध संस्थेने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करावे तितके कमीच आहे.