सजग चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
पुस्तकं आणि खेळ हे दोन्ही तसे म्हटले तर काहीसे परस्परविरोधी शब्द. परंतू या दोन्हींची एकत्र सांगड घालून कल्याणात एक अनोखे बालवाचनालय सुरू करण्यात आले आहे. सजग चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने सुरू झालेल्या एन-रीड नामक या बालवाचनालयाचे उद्घाटन अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
एन-रीड हे केवळ मुलांसाठीचे वाचनालय असून तिथे वयोगटानुसार वर्गीकृत अशी अनेक पुस्तके आणि खेळ उपलब्ध आहेत. एन-रीडचे उद्दिष्ट मुलांना वाचनाची सवय लावणे आणि त्यांच्या वयाला योग्य अशा विविध प्रकारच्या पुस्तकांशी त्यांचा परिचय करून देणे हे आहे जेणेकरून त्यांच्यामधे जिज्ञासा आणि सर्जनशीलता वाढण्यास मदत होईल. आपल्या पाल्यांसाठी दर्जेदार गोष्टींच्या शोधात असणाऱ्या पालकांसाठी नाविन्यपूर्ण पुस्तके आणि खेळ असलेले एन-रीड वाचनालय हे निश्चितच भेट द्यावे असे ठिकाण आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणारी बच्चे कंपनी या वाचनालयातील पुस्तकं आणि विविध खेळ बघून कमालीची खुश झाल्याची दिसून आली.
यावेळी खास मुलांसाठी एक वाचनालय तयार करणे ह्या सजगच्या उपक्रमाचे अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी कौतुक केले. तसेच अशा वाचनालयामुळे पालक आणि मुलांना एकत्रितपणे पुस्तकांच्या सहवासात वेळ घालवण्यासाठी मोकळे वातावरण मिळेल हा विश्वास व्यक्त केला. तर सजगच्या सह-संस्थापक सजिता ह्यांनी सांगितले की पुस्तकांमध्ये असलेली विविधता मुलांमध्ये कुतूहल जागृत करण्यास मदत करेल. याठिकाणी त्यांना शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींची शोध घेण्याची आवडही निर्माण होईल.
एन-रीडचे सभासद होण्यासाठी सजगचे पारनाका, कल्याण येथील कार्यालय किंवा वेबसाईट https://www.sajagtrust.org/ इथे संपर्क करता येईल असे आवाहनही यावेळी संस्थेकडून करण्यात आले.